अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोषागार कार्यालयातील अनेक कर्मचारींची कोरोना प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी इतरत्र नेमणूक केल्याने अनेक खात्यांचे वेतन रखडले आहे.
वेतन व निवृत्ती वेतन कर्मचार्यांना न मिळाल्याने अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन वेळेत मिळण्यासाठी नियोजन करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, उपाध्यक्ष विजय काकडे व भाऊसाहेब डमाळे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या आदेशान्वये जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांची कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी इतरत्र नेमणुका करण्यात आल्या आहेत.
यामुळे मार्च महिन्याचे अनेक खात्यांचे वेतन होऊ शकलेले नाहीत. कोषागार कार्यालयामध्ये राज्य शासकीय कर्मचार्यांचे वेतन, निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन असे आर्थिक बाबींशी निगडित असलेले कामे प्रलंबित राहिलेली आहेत.
त्यामुळे अनेक खात्यातील कर्मचार्यांची आर्थिक स्वरूपाची अडचण निर्माण झालेली आहे. बर्याच शासकीय कर्मचार्यांची कुटुंबीय कोरोनाविषाणू बाधीत झालेली असल्याने त्यांना औषधोपचारासाठी पैशाची अडचण निर्माण झालेली आहे.
शिवाय अनेक कर्मचार्यांनी पतसंस्थेचे कर्ज काढलेले असल्यामुळे त्यांच्यावर व्याजाचा आर्थिक बोजा वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये विविध खात्यांची कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंबियांना आर्थिक अडचणीत येऊ नये, म्हणून माहे मार्च,
एप्रिल महिन्याचे कर्मचार्यांचे वेतन, निवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्ती वेतन वेळेवर मिळण्याकरिता वित्तीय बाबींशी संबंधित असलेल्या कोषागार कार्यालयतील अधिकारी, कर्मचार्यांच्या नेमणुका करताना कर्मचार्यांचे वेतन व निवृत्ती वेतन वेळेवर मिळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|