अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. यामुळे दरदिवशी या आजाराने रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या फुफुसाला घात होऊन रुग्ण दगावत आहे.
असे असताना आता चक्क एका संसर्गजन्य आजराने जनावरांच्या फुफुसांवर परिणाम होऊन जनावरे दगावत आहे, यामुळे जिल्ह्यातील पशुपालक चिंताग्रस्त झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसांत फुप्फुसाचा संसर्ग होऊन ४० जनावरे दगावली असून, अवघ्या पाच ते सहा दिवसांत जनावरांचा मृत्यू हाेत आहे. विशेष म्हणजे, लसीकरण झालेल्या जनवारांमध्ये हा आजार बळावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेवासा तालुक्यातील जेऊर, कुकाणा, भेंडा, देवगाव आदी परिसरांतील मोठी ३०, तर लहान १० जनावरे अचानक दगावली आहेत. या जनावरांमध्ये सुरुवातीला ताप येणे व लाळ गाळणे, अशी लक्षणे आढळून आली.
लक्षणे आढळून आलेल्या जनावरांना तातडीने उपचार सुरू केले गेले, परंतु उपचार सुरू असताना जनावरांचा मृत्यू झाला. लाळ्या खुरकूत या आजाराने एवढ्या कमी वेळेत जनावरांचा मृत्यू होत नाही, परंतु हा आजार याहीपेक्षा वेगळा आहे.
मयत जनावरांमध्ये दुभत्या गायींची संख्या सर्वाधिक आहे. या आजाराबाबत माहिती मिळाल्यानंतर परिसरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने गोठ्यांना भेटी देत उपचारही सुरू केले. फुप्फुस कमकुवत होऊन जनावरे दगावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान नेवासा तालुका परिसरातील जनावरे अचानक दगावण्याचे प्रमाण वाढलेले आहे. एक दिवसांत चार ते पाच जनावरे दगावत असून, हा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.
या मृत जनावरांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड यांनी दिली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|