माहेरी आलेल्या बहिणीला भावाने विहिरीत दिले ढकलून

Ahmednagarlive24
Published:

सोलापूर : दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या बहिणीला सख्या भावाने विहिरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना रविवार, दि.१० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास बार्शी-कुर्डुवाडी बाह्यवळण रस्त्यालगत भोसरे (ता.माढा) शिवारात गोरख काळे यांच्या शेतात घडली. सविता कैलास गोसावी (वय ३५, रा. पिंपळखेडा, ता.जि.पुणे) असे त्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदरची महिला ही कुर्डुवाडी येथे दिवाळी सुट्टीनिमित्त माहेरी आली होती. रविवारी ती आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी भाऊ सुहास उर्फ सचिन गोसावी याने तिला बोलावून घेतले.

ब्राह्मणाने दिलेला नरळ तुझ्या हाताने विहिरीत टाकायचा आहे, असे म्हणून तिला बार्शी-कुर्डुवाडी रोडलगत असलेल्या गोरख काळे यांच्या शेतातील विहिरीजवळ घेवून गेला व तिला विहिरीत ढकलून दिले.

यावेळी काळे यांच्या शेतात खुरपणी करणाऱ्या महिलांना विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यानंतर आरडाओरडा ऐकूण महिलांनी विहिरीकडे धाव घेतली. प्रसंगावधानाने त्या महिलांनी रस्त्यावरून जात असलेल्या माजी नगरसेवक अमरकुमार माने व उद्योजक हरिभाऊ बागल यांना थांबवून घटनेबाबत सांगितले.

त्यांनीही तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. उडालेल्या गोंधळामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी त्या विहिरीकडे धाव घेतली. अमरकुमार माने, हरिभाऊ बागल, मुन्ना म्हमाणे, राजू शिंदे, खंडू मदने यांनी तात्काळ क्रेन मागवून पोलिसांना फोनद्वारे घटनेबाबत कळवले.

यानंतर घटनास्थळी क्रेन व पोलीस दाखल झाले. दत्तात्रय कुंभार हे प्रवासी विहिरीत उतरले आणि त्यांनी क्रेनच्या सहाय्याने विवाहित महिलेला सुखरूप बाहेर काढले. त्या महिलांनी सांगितल्याप्रमाणे एका व्यक्तीने महिलेस विहिरीत ढकलून देवून पळून गेल्याचे सांगितले.

सदर महिला विहिरीत पडल्यानंतर तब्बल दीड तास मोटारीच्या पाईपला धरुन पाण्यात होती. महिलेला सुखरूप बाहेर काढल्यानंतर बालाजी कोळेकर यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment