अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज बुधवार रोजी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
गोव्यात येत्या २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ३ मे रोजी सकाळपर्यंत हा लॉकडाऊन लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/04/395999-pramodsawant.jpg)
पण, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांनी काम नसताना बाहेर फिरू नये किंवा गर्दी करू नये, असे सांगितले तरी लोक ऐकत नाहीत. त्यामुळेच चार दिवस गोव्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
चार दिवस गोव्यात पर्यटन बंद राहील. ज्या पर्यटकांनी गोव्यात खोली आरक्षित केली आहे त्यांनी येऊन खोलीतच राहावे. आम्ही राज्याच्या सीमा बंद केलेल्या नाहीत. सीमा खुल्या राहतील, पण चार दिवस राज्यात कुठेच पर्यटक फिरू शकणार नाहीत.
काय सुरू अन काय बंद? जाणून घ्या :-
- अत्यावश्यक सेवा सुरू. जीवनावश्यक सेवेअंतर्गत येणारी दुकाने सुरू.
- सार्वजनिक वाहतूक, कॅसिनो, बाजार पूर्णपणे बंद राहणार.
- बार, रेस्टॉरन्ट बंद राहतील. होम डिलिव्हरी सुरू राहील.
- औद्योगिक कंपन्या व त्याअंतर्गत येणारी वाहतूक सुरू.
- कडक कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
दरम्यान, सध्या गोव्यात ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा नसून जितकी गरज आहे, तेवढा ऑक्सिजन पुरवला जात असल्याचे देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, त्यांनी चाचणीच्या रिपोर्टची प्रतीक्षा न करता तातडीने उपचारांना सुरुवात करावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|