अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- राहुरी तालुक्यात करोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बहुतेक ठिकाणी रूग्णालयात देखील उपचारासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे बहुतेक रूग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे आता गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधीत गावातील स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतींना तशा सूचना करण्यात आल्या आहेत.
विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या संकल्पनेतून राहुरी तालुक्यामध्ये ‘माझ्या कुटुंबाची जबाबदारी’ सर्वेक्षण सुरू होणार असून त्यामध्ये लॉकडाऊन फेस वनमध्ये ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन लोकांच्या तपासण्या केल्या होत्या,
त्या पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजनची पातळी किती आहे? इतर लक्षणे आहेत का? त्याचबरोबर घरी एखादा पॉझिटिव्ह रुग्ण तर नाही ना? याची तपासणी हे पथक करणार आहे.
या पथकामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच शिक्षक यांचा समावेश राहणार असून या पथकास पल्स ऑक्सीमिटर, थर्मल स्कॅनर व इतर अनुषंगिक साहित्य संबंधीत ग्रामपंचायतमार्फत पुरविण्यात येणार आहे.
गावांमधील सौम्य लक्षणे असणारे व रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांना आता गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सरपंच, पोलीस पाटील, तलाठी,
ग्रामसेवक, ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींच्या नियुक्त्या करून जबाबदारी देण्यात येणार आहे.
त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळेचा उपयोग क्वारंटाईन सेंटर म्हणून केला जाणार आहे. परिणामी आता रूग्णसंख्या देखील आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|