अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-मृत झालेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यविधी शहरात अथवा शहराबाहेर करण्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. नागापूर येथील अमरधाममध्ये कोरोना मृतांवर अंत्यविधी करण्यास विरोध करणार्या राजकीय व्यक्तीचे नातेवाईक कोरोनाने निधन झाले.
त्या नातेवाईकाचा अंत्यविधी करण्याची वेळ सदर राजकीय पुढार्यांवर आली. असल्याची माहिती कोरोना मृतदेहाच्या अंत्यविधीची जबाबदारी स्विकारणारे अंतोन गायकवाड यांनी दिली. तर या माणुसकीच्या कार्यास विरोध न करता सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
मृत झालेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत असताना, नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यविधी करण्यात येत आहे.
नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेऊन नागापूर येथील स्मशानभूमीत कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यविधीची जबाबदारी उचलली आहे. तर कोरोनाने मयत झालेल्यांचे मृतदेह आनण्यासाठी अत्यल्पदरात शववाहिका देखील उपलब्ध करुन दिली आहे.
मात्र दोन दिवसापुर्वी माजी नगरसेवक असलेल्या राजकीय व्यक्तीने या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती दर्शवून अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला होता. तर सोययुक्त अमरधाम तयार केल्यानंतर अंत्यविधी करण्याचे सुचवले.
कोरोना मृतांवर सुरु असलेले अंत्यविधी थांबवावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनपा उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला होता. दुर्देवाने याच राजकीय व्यक्तीचे नातेवाईक कोरोनाने निधन झाल्याने अमरधाममध्ये आनण्यात आले.
त्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला. कोरोनाच्या संकटकाळात राजकीय स्टंटबाजी न करता नागापूर अमरधाममध्ये अंत्यविधी करु द्यावे. अमरधाम परिसरात लोकवस्ती नसल्याने नागरिकांना याचा धोका नाही व याला नागरिकांचा देखील विरोध नाही.
मात्र मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
तर कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी विरोध करणार्यांवर साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|