गरज १२ कोटी लसीची; मिळणार फक्त १८ लाख!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-राज्याला १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी लसींची (सहा कोटी नागरिकांसाठी प्रत्येकी दोन डाेस) गरज आहे. मात्र मे महिन्यात राज्याला केंद्राकडून १८ लाख लस उपलब्ध होणार आहेत.

आगाऊ रक्कम देऊन लस खरेदी करण्याची राज्याची तयारी असली तरी दोन्ही कंपन्यांची मर्यादा लक्षात घेता वाढीव लस लगेचच मिळण्याची शक्यता नाही. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी समाज माध्यमाद्वारे संवाद साधला.

ते म्हणाले, महाराष्ट्राने १ कोटी ५८ लाखपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण के ले आहे. ३ एप्रिलला एका दिवसांत ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.

त्यानंतर आता २६ एप्रिलला राज्याने ५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करून विक्रम केला. दररोज ८ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्यात ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी अशी सर्वाधिक ६,१५५ लसीकरण केंद्रे आहेत,

अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक हे दोनच लसउत्पादक असून त्यांची तेवढी क्षमता नाही. त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. मे महिन्यात १८ लाख लस राज्याला देण्यात येतील असे केंद्र सरकारने कळवले आहे,

पण कधी देणार ते कळवलेले नाही. सध्या त्यापैकी तीन लाख लसमात्राच राज्याला मिळाल्या आहेत. त्यामुळे उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येईल. जून-जुलैपासून लस उपलब्धतेत वाढ होईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. दुसरी आपण अनुभवत आहोत. रेमडेसिविर आणि प्राणवायूचा पुरवठा या दोन समस्या आहेत. देशात सर्वत्र त्यांची टंचाई असल्याने केंद्र सरकारने या दोन्ही गोष्टींचे नियंत्रण आपल्याकडे घेतले आहे.

राज्याला ५०० टन अतिरिक्त प्राणवायू इतर राज्यांतून पुरवण्यात येत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आपण सज्ज होत आहोत. राज्यात महाराष्ट्र दिनापासून १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे लसीकरण सुरू होईल.

त्यासाठी सुमारे १२ कोटी मात्रांची गरज आहे. त्यांची आगाऊ किंमत चुकती करण्याची आमची तयारी आहे. परंतु, लसच उपलब्ध नाहीत!

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe