पुणे :- सलग निर्माण झालेली चक्रीवादळे आणि कमी दाबाचे क्षेत्र यांच्या प्रभावामुळे राज्याने यंदा सुमारे पाच महिन्यांचा पावसाळा अनुभवला. एरवी गुलाबी थंडीची चाहूल घेऊन येणारी दिवाळी यंदा पावसात भिजली.
त्यानंतरही वातावरण ढगाळच राहिले. आता मात्र हवामान निवळले असून राज्यात सगळीकडे थंडीची सुरुवात होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानातील तफावतही थंडीचे आगमन सूचित करत आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव हळूहळू राज्यात जाणवू लागण्याची चिन्हे आहेत. सध्या पहाटेच्या वेळी अनेक शहरांवर धुक्याची चादर पसरत आहे. त्यामुळे आगामी तीन ते चार दिवसांत थंडीचा प्रभाव सगळीकडे दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दबुलबुल चक्रीवादळ ओडिशा, प. बंगालकडे सरकल्यावर मात्र हवामान निवळले असून थंडीचे आगमन राज्यात होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान घटत असल्याचे दिसत आहे. कमाल तापमानही सरासरीच्या आसपास आहे. घाटमाथ्यावरील तापमानातही लक्षणीय घट दिसते आहे.