मदत करण्याऐवजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी वेळो वेळी स्टंटबाजी करत आहे !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-कोरोनाच्या संकट काळात रुग्ण व नागरिकांना मदत करण्याऐवजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी वेळो वेळी स्टंटबाजी करत आहे.

आपल्या हस्ते उद्घाटन झाले नाही तर कोविड सेंटरला ऑक्सिजन देणार नाही,अशी धमकी ते देत आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता केला.

अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे सोमवारी ५० ऑक्सिजन युक्त बेड कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यावरुन झालेल्या मानापमान नाट्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.

पिचड म्हणाले,ऑक्सिजनचे राजकारण करण्याची भाषा शोभत नाही. तालुक्यात आरोग्य सेवा हतबल झाली आहे. रेमडीसीविरचा हिशोब नाही, रुग्णांकडून रेमडेसिवीरचे बिल उकळले जात आहे.

आरोग्य कर्मचारी कमी आहे, ठराविक आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ताण येत आहे. त्यांना बदली कर्मचारी मिळत नाही.

तुम्ही स्वत: डॉक्टर आहात, तुम्हाला मोठ्या अपेक्षेने जनतेने निवडून दिले आणि तुम्ही याबाबत काहीच करीत नाही हे दुर्दैव आहे.

सुगाव खुर्द येथील अडीच कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र माझ्या आमदारकीच्या काळात उभे राहिले. ग्रामपंचायत सुगावने त्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र दिले हे लोकप्रतिनिधी विसरलेले दिसतात.

ज्यांच्या सहकार्यामुळे ही इमारत उभी राहिली ते जि.प. सदस्य कैलासराव वाकचौरे, जालिंदर वाकचौरे यांचीही लोकप्रतिनिधी वाट पाहू शकले नाही, हे दुर्दैव आहे.

पद्मश्री राहीबाई पोपेरे व समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख या भूमीपुत्रांची वाट न पाहता केवळ स्टंटबाजी करीत आ.डॉ.किरण लहामटे यांनी स्वत:च फीत कापून निघून गेले. हा या महान भूमीपुत्रांचा अवमान आहे,असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe