अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढू लागला आहे . यामुळे नागरिकांनी आता याचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.
यामुळे सर्वत्र लसीकरणासाठी नागरिक गर्दी करू लागले आहे. असेच काहीसे चित्र सध्या कर्जत तालुक्यात दिसून येत आहे. नागरिक पहाटपासूनच लसीकरणासाठी रांगा लावत आहेत. नगर जिल्ह्यात नागरिकांची लसीकरणासाठी एकच गर्दी होऊ लागली आहे. यातच जिल्ह्यात लसीकरणाचा तुटवडा भासतो आहे.
दरम्यान कर्जत तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिक तालुक्यातील लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत.
मात्र, लसीकरण नियमितपणे होत नाही. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेक जण पहिल्या व दुसऱ्या डोससाठी रांगेत उभे राहतात. मात्र, लस मिळत नाही. ज्येष्ठ नागरिक कोरोना लसीसाठी पहाटेच लसीकरण केंद्रांवर रांगेत उभे राहून लस न घेताच घरी परतत आहेत.
पहिला डोस, दुसरा डोस, १८ ते ४४ या वयोगटातील डोस यांचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडाला आहे. याबद्दल चौकशी केली असता नागरिकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोनाची चाचणी केली जाते. मात्र, त्याचा अहवाल येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. या काळात अनेक जण बिनधास्तपणे फिरत असतात. त्यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
तरच तालुक्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी आटोक्यात येऊ शकते. तसेच जिल्ह्यात लसीचा योग्य तो पुरवठा व्हावा अशी मागी नागरिक करू लागले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|