भारतासोबत व्यापार बंद केल्यानंतर पाकिस्तान संकटात!

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : भारतासोबतचे सर्व प्रकारचे व्यापार संबंध तडकाफडकी तोडणे पाकिस्तानला चांगलेच भोवले आहे. भारताने जम्मू-काश्मीरसंबंधित ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता. मात्र आधीच महागाई आणि आर्थिक कमजोरीच्या समस्यांमध्ये होरपळत असलेल्या पाकिस्तानसमोरील अडचणी अधिक वाढल्या आहेत.

भारतासोबत व्यापार बंद केल्यामुळे कापसाची आयात करण्यासाठी पाकिस्तानला आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय पाकिस्तानमध्ये औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. कापूस उत्पादनात सतत घसरण होत आहे.

पाकिस्तानला स्वत:ची गरज पूर्ण करण्यासाठी परदेशातून महागडे कापसाचे सूत आयात करावे लागू शकते, अशी शंका पाकिस्तानमधील माध्यमे व्यक्त करत आहेत. ‘द न्यूज’ने याबाबत गेल्या महिन्यातच वृत्तही दिले होते. पाकिस्तान कॉटन जिनर्स असोसिएशनच्या आकडेवारीचा हवाला देत सूत उत्पादनात २६.५४ टक्क्यांची घसरण झाल्याचाही उल्लेख वृत्तात करण्यात आला होता.

पाकिस्तानमध्ये या वर्षी कापसाचे उत्पादन अत्यंत कमी आहे. मात्र भारतात कापसाचे उत्पादन वाढणार आहे. भारतीय कॉटन संघटनेच्या अंदाजानुसार, या वर्षी कापसाचे उत्पादन ३५४ लाख गाठी राहू शकते, तर गेल्या वर्षी हे उत्पादन ३१२ लाख गाठी एवढे होते.

सीमावर्ती देश असल्यामुळे पाकिस्तानला भारतातून कापूस विकत घेणे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे आणि स्वस्त होते. मात्र व्यापार बंद झाल्यामुळे भारताकडून कापूस खरेदीही बंद झाली आहे.

भारतीय कापसाचा सध्याचा दर ६९ सेंट प्रति पौंड आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात हाच दर ७४ सेंट प्रति पौंड आहे. त्यामुळे भारताकडून कापूस खरेदी पाकिस्तानला तुलनेने स्वस्त आहे. भारतीय व्यापाऱ्यांच्या मते, पाकिस्तानने भारतासोबत व्यापार सुरू केल्यास गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त कापूस खरेदी करता येईल. कारण यावर्षी पाकिस्तानमध्ये कापसाचे उत्पादन कमी आहे.

अमेरिकन संस्था यूएसडीएच्या ताज्या अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये यावर्षी कापसाचे उत्पादन ८९.९ लाख गाठी आहे, जे गेल्या वर्षीच्या ९७.५ लाख गाठीपेक्षा कमी आहे. यूएसडीएच्या मते, पाकिस्तानमध्ये या वर्षी १३७.२ लाख गाठीची गरज पडू शकते आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी ४२.६ लाख गाठी आयात करण्याची आवश्यकता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment