श्रीगोंदा – बनावट नोटा तयार करून त्या वितरित करणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गावित यांनी ही कामगिरी केली आहे.
आतापर्यंत अतुल रघुनाथ आगरकर, श्रीकांत सदाशिव माने, अमित भीमराव शिंदे, युवराज लक्ष्मण कांबळे, सुमित भीमराव शिंदे, शिवाजी श्रीपती शिंदे व शिवाजी रामदास जरी यांना पोलिसांनी गजांआड केले आहे.
बनावट नोटा तयार करण्याचे ठिकाण पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी दिली. यातील आरोपी श्रीकांत माने आणि एका संशयित महिलेमध्ये आर्थिक व्यवहार होते.
या महिलेच्या माध्यमातून पुणे आणि परिसरात अशा प्रकारच्या बनावट नोटा तयार करून त्याचे बाजारात वितरण करण्यात येत होते. श्रीकांत माने याने झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा तयार करण्याचा प्लॅन तयार केला. यासाठी युवराज कांबळे यांची मदत घेतली.
कांबळेने श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील शिवाजी जरे यांच्या मदतीने नगर व पुणे जिल्ह्यात या बनावट नोटा वितरित केल्या. यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे एका फार्म हाऊसवर त्यांनी बनावट नोटा तयार करण्याचे मशीन ठेवले होते.
या मशिनद्वारे त्यांनी सुरुवातीला शंभर रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या. या नोटा कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथील एका व्यक्तीला सर्वप्रथम देण्यात आल्या होत्या. यानंतर या नोटा खपविण्यासाठी अनेकांची मदत घेण्यात आली.
यामध्ये अतुल आगरकर हाही एक प्रमुख आरोपी असून, त्याला चोरीचे सोने विकत घ्यावयाचे होते. यासाठी त्याला शिवाजी झरे आणि त्या मुलीच्या मध्यस्थीने सुमारे दहा लाख रुपये देण्याचे ठरले होते.
कर्जत येथे आगरकर यांनी पूर्ण रक्कम न घेता साडेतीन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेतल्या. या नोटा घेऊन जात असताना अतुल आगरकर श्रीगोंदा पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्या अटकेनंतर बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले.