पारनेर | पायरीवर नतमस्तक होत आमदार नीलेश लंके यांनी बुधवारी विधिमंडळात प्रवेश केला. दिवसभर त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली.
राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीसाठी लंके मुंबईत होते. बैठकीनंतर पक्षाच्या विविध नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. विधानसभेत काम करताना आपली बाजू कशी प्रभावीपणे मांडता येईल, याचे धडेही त्यांनी ज्येष्ठांकडून घेतले.
बुधवारी सकाळी सहकाऱ्यांसह प्रथमच त्यांनी विधिमंडळात प्रवेश केला. मतदारसंघातील नागरिकांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहण्याची मनाशी खूणगाठ बांधत लंके यांनी विधिमंडळाच्या पायरीला वंदन केले.
मी सर्वसामान्य आहे, पण असामान्य काम करून दाखवेन, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विविध आमदारांच्या गाठीभेटी लंके यांनी घेतल्या.
अभ्यास करण्यासाठी काही संदर्भग्रंथही घेतले. विविध दालनांमध्ये जाऊन तेथील कामकाजाची तोंडओळख करून घेतली.