लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्याच केल्या चाचण्या…!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 : – कोरोना चाचण्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्याच चाचण्या केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांना भरदुपारी दोनपर्यंत ताटकळत ठेवले जात आहे.

विशेष म्हणजे ४५ वयापुढील नागरिकांसाठी तालुक्यातील इतर आरोग्य केंद्रात उपकेंद्रनिहाय लसीकरण सुरू केले आहे. मात्र येथील वैदयकीय अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना लसीसाठी २५ किलोमीटर अंतराची ससेहोलपट सहन करावी लागत आहे.

सुरूवातीला लसीकरणासाठी नकार देणारे कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर आता लसीसाठी धावपळ करु लागले आहेत. तर गावागावात वाढता संसर्ग पाहता धास्तीने घाबरून नागरिक चाचण्यांसाठी पुढे येत नाहीत.

त्यामुळे प्रशासनासोबतच गावागावातील आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. मात्र जिल्ह्यास्तरावरून कुठलेच अधिकृत आदेश नसतांना लसीसाठी आलेल्या नागरीकांनाच चाचणीसाठी वेठीस धरले जात आहे.

लस उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य केंद्रात सकाळी आलेल्या जेष्ठ नागरिकांना आर.टी.पी.सी.आर व अँटीजेन चाचण्यांसाठी दुपारी दोन तीन वाजेपर्यंत उन्हातान्हात रखडवून ठेवले जात आहे.

एकीकडे कोरोना हाँटस्पाँट असलेल्या गावात चाचण्यांसाठी कीट उपलब्ध होत नसतांना लसीसाठी आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करण्यासाठी किट वाया घालवल्या जात आहेत.

विशेष म्हणजे लसीपूर्वी चाचण्यांची घिसडघाई केली जात असतांना त्यातील आर.टी.पी.सी.आर चाचण्यांचा अहवाल मात्र तीन दिवसांनी मिळत असल्याने तोपर्यंत बाधीत असलेल्या व नसलेल्या सर्वांनाच लस दिली जात आहे. त्यामुळे या चाचण्यांचे नेमके आऊटपुट काय? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News