अहमदनगर :- नगर शहरातील तारकपूर बसस्टॅण्ड येथे बसमधील प्रवाशांना तसेच बसचालकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत एका ट्रकचालकासह ८ ते १० जणांनी अंदाधूंद दगडफेक करुन बसकंडक्टरसह पोलिसांना लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजता घडली.
बसचालकाने ट्रकला कट मारल्याच्या रागातून ट्रकचालकाने ओळखीच्या लोकांना बोलवून बसवर दगडफेक करून बसचालक, बसमधून प्रवास करीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केली.
य़ा प्रकरणी अज्ञात ट्रकचालक व त्याच्याबरोबर आलेल्या लोकांविरुद्ध जीवितास धोका निर्माण करणे, मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विलास भगवान पवार (वय 38, रा.उदरमल, ता.नगर) हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस (क्र.एमएच १४ बीटी ५०७६) घेऊन तारकपूर बसस्टॅण्ड आगारात गेटमधून प्रवेश करत असताना ट्रक (क्र.एमएच १७ बीवाय ९७५२) वरील चालक व त्याच्या ८ ते १० जोडीदारांनी प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण होईल याची जाणीव असतानाही बसवर अंदाधुंद गडफेक करुन बसचालक व प्रवाशांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व एसटी बसचे मोठे नुकसान केले.
यावेळी जमावाने बस कंडक्टर शिवाजी गोपाळ जाधव, बसमधील प्रवासी पोलिस कर्मचारी यांना लाथाबुक्क्यानी व काठीने मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी बसचालक विलास पालवे यांच्या फिर्यादीवरुन खुनाच्या प्रयत्नाची नोंद केली आहे.
याप्रकरणी दुसऱ्या दिवशी बसचालकाने अज्ञात ट्रकचालक व त्याच्याबरोबर आलेल्या दहा लोकांविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे. ट्रकचा नंबरही फिर्यादीत नोंदविला आहे. त्यावरून पोलिसा आरोप़ींचा शोध घेत आहेत.