निमगाव वाघात घरातच रमजान ईद व संभाजी महाराज जयंती साजरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- निमगाव वाघा (ता.नगर) येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरातच रमजान ईद व छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.

श्री नवनाथ युवा मंडळ व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी घरातच छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. तर गावातील मुस्लिम समाजातील कुटुंबीयांना प्रातिनिधिक स्वरुपात ईदच्या शुभेच्छा देऊन धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले.

डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, अतुल पुंड आदी उपस्थित होते.

तर उद्योजक दिलावर शेख यांच्या कुटुंबीयांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या मुन्नाबी शेख, डॉ. विजय जाधव, अनिल डोंगरे, आदर्श माता पुरस्कारप्राप्त ताराभाभी शेख, उद्योजक चांद शेख, अल्लाबक्ष शेख आदी हजर होते.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, कोरोनाचे संकट असल्याने सर्व संभाजी महाराज जयंती निमित्त होणार्‍या सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्वांनी नैतिक जबाबदारी म्हणून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

या अदृश्य शत्रूशी लढा देताना संभाजी महाराजांचे स्मरण करुन बळ मिळणार आहे. या लढ्यात सर्व समाजाने एकत्र येऊन जबाबदारी स्विकारल्यास कोरोनावर मात करता येणार असल्याची भावना त्यांने व्यक्त केली.

पै.संदिप डोंगरे यांनी कोरोनाला हरवून नवीन भारताची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी युवकांसह प्रत्येक नागरिकाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. युवकांनी देखील कोरोनाच्या लढ्यात घरीच थांबून स्वत:सह कुटुंबीयांचे लसीकरण करुन घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe