अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कोविड सेंटर शासनाने ताब्यात घ्यावे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुरू असलेले कोविड सेंटर शासनाने ताब्यात घेऊन पन्नास खाटांचे ऑक्सिजन युक्त सेंटर सुरू करावे, अशी मागणी विविध पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.

याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, चैतन्य उद्योगसमूहाचे अध्यक्ष गणेश भांड,

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, खेळाडू आप्पासाहेब ढुस, नानासाहेब कदम आदींनी बोलताना सांगितले की,

देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या जागेत कोविड सेंटर मागील वर्षापासून उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व सुविधा नगरपरिषदेने उभ्या केल्या असतानाही हे सेंटर खाजगी लोकांकडून चालवले जात आहे.

त्याचा सर्वसामान्य लोकांना काही फायदा होत नाही. सहारा लॉन्स येथे आमदार लहू कानडे यांच्या माध्यमातून कोरोना केअर सेंटर चालू आहे. त्यातून अनेक जणांना रुग्णसेवा मिळत आहे,

मात्र ज्याला ऑक्सिजनची गरज आहे, अशा पेशंटचे मात्र हाल होत आहेत. बेड मिळत नसल्यामुळे अनेक पेशंटच्या नातेवाईक यांची ससेहोलपट होत आहे. देवळाली येथील हे ऑक्सिजनयुक्त सेंटर शासनाने ताब्यात घेतल्यास त्याचा फायदा अनेकांना होऊ शकतो.

त्यामुळे आम्­ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करून हे सेंटर शासनाने स्वत: ताब्यात घेऊन तेथे मोफत रुग्ण सेवा सुरु करावी, अशी मागणी करणार आहोत.

त्याचबरोबर देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १७ गावे येतात. या आरोग्य केंद्रास प्रत्येक दिवशी किमान ५०० लस उपलब्ध करून दिल्या जाव्यात,अशी आमची मागणी आहे.

त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी व गाळेधारकांचे भाडे यामध्येे ५० टक्के सवलत मिळावी,अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe