अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- श्रीरामपूर थील ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरला दुबईतून सुमारे २ लक्ष ११ हजार रुपयांची देणगी मिळाली.
मूळ श्रीरामपूरचे व सध्या दुबई येथील राशीद इंटरनॅशनल हॉस्पिटल येथे आयसीयु इनचार्ज म्हणून काम करणारे डॉ.वसीम शेख यांनी परदेशात राहून संकटकाळात मायभूमीसाठी मदतीचा हात पाठवला आहे.

ग्रामीण रुग्णालयात शासनाने ५० बेडचे मोफत कोविड सेंटर सुरू केले असून, त्यामध्ये सुमारे ४२ ऑक्सिजन बेड आहेत. रुग्णांना चहा-नाश्ता व जेवणही दिले जाते. आजवर अनेक तातडीच्या रुग्णांना याचा लाभ झाला आहे.
या उपक्रमाची माहिती दुबईतील डॉ.वसीम शेख यांना मिळाली. आपल्या मायभूमीशी नाळ कायम ठेवण्याच्या जाणिवेने त्यांनी ग्रामीण रुण्गालयाचे डॉ.तौफिक शेख यांच्याशी संपर्क साधला. डॉ.वसीम शेख यांनी सहकारी डॉ.दीपाली,
डॉ.प्रशांत यांच्या ‘हेल्प फॉर इंडिया’ या संस्थेच्या माध्यमातून कोविड सेंटरला मदत म्हणून सुमारे २ लक्ष ११ हजार रुपयांची वैद्यकीय सामुग्री पाठविली. यामध्ये प्रामुख्याने उच्च प्रतीचे व ब्रँडेड पी.पी.ई. किट, एन-९५ मास्क, फेस शिल्ड, सर्जिकल मास्क, कॅप, ग्लोव्हज यांचा समावेश आहे.
यावेळी डॉ.वसीम यांचे वडील व निवृत्त दूरसंचार अभियंता शब्बीर शेख यांनी स्वत: ग्रामीण रुग्णालयात येऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश बंड यांच्याकडे ही सामुग्री सुपूर्द केली. यावेळी डॉ.बंड म्हणाले की, सामाजिक दातृत्वामुळे अनेक देणगीदार, सामाजिक संस्था शासनास सहकार्य करत आहे.
ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीनसह, पाण्याचे बॉटल, वस्तूंच्या स्वरूपात मदतीसाठी हात पुढे येत आहेत.याचा आम्ही रुग्णांसाठी नक्कीच उपयोग करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मुकुंद शिंदे, डॉ.तौफिक शेख, डॉ.स्वप्नील पूरनाळे, प्रसन्न धुमाळ, लक्ष्मीकांत करपे, निशिकांत बूगुदे आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम