अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- पत्नीची हत्या करून तिने आत्महत्या केली आहे, असा बनाव करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील पती विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी याच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मढी खुर्द येथील विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी व त्याची पत्नी सुवर्णा यांच्यात १३ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास भांडण झाले होते. त्यावेळी विजय याने पत्नीच्या डोक्यात टणक शस्राने मारून ठार केले.
मृत शरीरावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मृत शरीरावर नवीन कपडे घातले व पत्नीने आत्महत्या केल्याची नातेवाईकांना माहिती दिली होती.
सुवर्णा गवळी हिने आत्महत्या केली असल्याच्या खबरीवरून कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला १४ मे रोजी अकस्मात मृत्युची नोंद केली होती.
पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी या घटनेची चौकशी केली असता त्यातून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे समोर आले.
याबाबत हेड कॉन्स्टेबल अमर गवसने यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, आरोपीने मृत सुवर्णाच्या डोक्यात टणक शस्त्राने मारून ठार केले.
मृत शरीरावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केल व पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील जळालेले कपड्यांचे अवशेष लपवून ठेवले. तिच्या मृत शरीरावर नवीन कपडे घातले.
सुवर्णा हिने आत्महत्या केल्याची खोटी माहिती नातेवाईकांना देऊन पुरावा नष्ट केला. याप्रकरणी विजय ऊर्फ बंडू गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम