कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची परिस्थिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- टाळेबंदीचा काळावधी दिवसंदिवस वाढत असताना सर्वसामान्यांना दोन वेळचे जेवण मिळण्यासाठी राज्य सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना गहू, तांदळा बरोबर दरमहा गोड तेल, तूरडाळ व एक गॅस टाकी मोफत देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व राज्यात महामारी चे सावट आहे. टाळेबंदीमुळे सर्व व्यवसाय, उद्योगधंदे बंद आहेत.

हातावर पोट असलेल्या मोलमजुरांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. कुटुंबाची उपासमार चालू असताना या कोरोना महामारीत शरीर कसे सदृढ ठेवणार हा मोठा प्रश्‍न सर्वसामान्यांपुढे आहे.

कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.रेशनवर मिळणारा गहू, तांदूळाने कुटुंबाचा उदरनिर्वाह भागणार नसून, फक्त भात व गहू कशाबरोबर खावे? हा देखील प्रश्‍न आहे. रेशनवर तूरडाळ मिळाल्यास तांदळाबरोबर खिचडीकरुन खाता येऊ शकते.

तसेच महाग झालेले गोड तेल देखील स्वयंपाकासाठी अत्यावश्यक आहे. तर अन्न शिजवण्यासाठी गॅस आवश्यक आहे. सध्या गॅसचे दर देखील भरमसाठ वाढल्याने ते सर्वसामान्यांना घेणे परवडत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

कोरोना महामारीच्या टाळेबंदीत सर्वसामान्यांना जगविण्यासाठी राज्य सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना गहू, तांदळा बरोबर दरमहा गोड तेल, तूरडाळ व एक गॅस टाकी देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी केली आहे.

निवेदनावर गणेश ढोबळे, सतीश बोरुडे, गणेश वामन यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. सदर निवेदन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना देखील पाठविण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe