ह्या ठिकाणी नागरिकांना महिन्यातून केवळ 3 वेळेस होतोय पाणीपुरवठा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचा जिल्हा सामना करतो आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नागरिक सध्या पाण्यासाठी तरसले आहे.

तब्बल दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो म्हणजेच शेवगावकरांना महिन्यातून केवळ 3 वेळेस पाणी मिळते. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात चांगलाच संताप निर्माण झाला आहे. जायकवाडीतील दहिफळ जॅकवेलवरून शेवगाव- पाथर्डीसह 54 गावांना पाणीपुरवठा केला जातो.

ही योजना 25 वर्षांपूर्वीची असल्याने, जीर्ण झालेल्या जलवाहिन्या पाण्याच्या कमी-अधिक दाबाने वारंवार फुटतात. दहिफळ जॅकवेलसाठी होणारा वीजपुरवठा वादळी वारे, अवकाळी पाऊस व इतर तांत्रिक कारणांमुळे वारंवार खंडित होतो.

शेवगाव शहर व तालुक्‍यासाठी नियमित आवश्‍यक असलेला 35 ते 40 लाख लिटर पाणीउपसा योजनेतून होत नाही.

त्यामुळे योजनेवरील गावे व शेवगाव नगरपालिका टाक्‍या भरण्यासाठी इतरांच्या व्हॉल्व्हवरून पाण्याची पळवापळवी करतात. भरमसाट अनधिकृत नळजोड, जलवाहिन्या व व्हॉल्व्हच्या सावळ्या गोंधळामुळे शेवगाव शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे.

पाणी सोडणारे कर्मचाऱ्यांची मनमानी; नागरिकांना अरेरोवी :- पाणीपुरवठा कर्मचारी ठराविक नागरिकांवर वेगवेगळ्या कारणांमुळे मेहेरबान असल्याने, जास्त वेळ पाणी सोडणे, अधिक संख्येने अनधिकृत नळजोड देणे, असे प्रकार शहरात सर्रास सुरू आहेत.

पाणी उपलब्ध नसल्याने प्रसंगी विकतचे पाणी घेण्याची वेळ येते. शहराचा विकास होण्याऐवजी शहर भकास होत चालले आहे.

शहरातील नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींना देखील तालुक्याचे काही घेणेदेणे नाही, यामुळे नागरिकांवर हि वेळ ओढवली आहे. मतांसाठी जनतेचे पाय धरणारे पुढारी मंडळी त्यांचे काम झाले की नागरिकांना समस्यांच्या विळख्यात सोडून देतात. हि शेवगावची जुनी परंपरा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe