अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. मात्र असं असलं तरीही रस्त्यावरील गर्दी अद्यापही कायम आहे.
हीच गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन आता कठोर पाऊले उचलणार आहे. नगर शहरात मंगळवारी पोलिसांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली, तर काहीजणांचे वाहनेही जप्त केले. १ जूनपर्यंत ही वाहने पोलीस स्टेशनमध्ये ठेवली जाणार आहेत.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू करत संचारबंदी केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक नागरिक हे विनाकारण वाहनांमधून फिरत असल्याचे आढळून येत आहे.
पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या नाकाबंदीमध्ये ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय वाहनांवरून फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने नगर शहरासह जिल्हाभरात रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहेत. सोमवारी जिल्हाभरात केलेल्या अँटिजन चाचणीमध्ये तब्बल ५० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
जे पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांना सरकारी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम