अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व बँक कर्मचारींचे कोरोना लसीकरण होण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले असून,
निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व बँक कर्मचार्यांना प्राधान्याने लसीकरण करुन घेण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्र पाठविले आहे.
शहरासह जिल्ह्यात बँक कर्मचार्यांना प्राधान्याने लसीकरण सुरु झाले असून, शिवसेना व जिल्हा अग्रणी बँकच्या मागणीला यश आले आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थाक संदीप वालावलकर यांनी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे प्राधान्याने कोरोना लसीकरण होण्याची मागणी केली होती.
महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी बँक कर्मचार्यांचे लसीकरण होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन निर्देश दिले होते. नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी यांनी देखील बँक कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला असून, संबंधित आरोग्य विभागाल निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालय, सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करुन ते सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था या नागरिकांच्या आर्थिक बाबींशी निगडित असल्याने या मधील कर्मचार्यांचा शासकीय कर्मचार्यांप्रमाणे जनतेशी संपर्क असतो.
कोरोनाच्या संकटकाळात गरजा पुर्ण करण्यासाठी पैश्याकरिता नागरिकांना बँकेत जावे लागते. सध्या सर्व बँक व पतसंस्थेचे कर्मचारी फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून सेवा देत आहेत.
अनेक बँक कर्मचारींना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा यामध्ये जीव देखील गेला. बँक कर्मचार्यांचे लसीकरण झाले नसल्याने जीव मुठित धरुन ते सेवा देत होते.
बँक कर्मचार्यांचा लसीकरणासाठी सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थाक संदीप वालावलकर यांनी जिल्हा प्रशासन व महापालिकेचे आभार मानले आहे.
बँक कर्मचारी संकटकाळात अविरतपणे सेवा देत आहेत. फ्रन्टलाईनची सेवा देऊन देखील ते लसीकरणापासून वंचित होते. अनेक बँक कर्मचारी सेवा देत असताना कोरोनाने मयत झाले.
लस घेण्याची इच्छा असून देखील बँकेच्या कामकाजाची जबाबदारी असल्याने रांगेत थांबून लस घेणे त्यांना अशक्य होते. यासाठी शिवसेनेच्या वतीने त्यांच्या लसीकरणासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला यश आले असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी स्पष्ट केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम