अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- तौत्के चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर ते गुजरातमधून पुढे गेले खरे, पण राज्यात या चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील जिल्ह्यांचे या चक्रीवादळात मोठे नुकसान झाले आहे.
इतकेच नाही तर या तौत्के चक्रीवादळाच्या काळात मुंबईजवळ समुद्रात चार जहाजांवर ७१३ जण अडकले होते. त्यातील ९३ जण बेपत्ता होते. आता त्यातील १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत.
या चार जहाजांवरील ६२० जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र ओएनजीसीची एक बार्ज पी ३०५ या चक्रीवादळात बुडाली असून त्या जहाजावरील नव्वदहून अधिक जण अद्यापही बेपत्ता आहेत.
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून १७५ किलोमीटर अंतरावर हीरा फिल्ड्समध्ये बार्ज पी ३०५ चे रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरु आहे. सोमवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. या बार्जवर २७३ जण प्रवास करत होते.
या जहाजाच्या चालक दलासोबतच इतर प्रवाशांना वाचवण्यासाठी आयएनएस कोलकाता आणि आयएनएस कोच्ची शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पी ३०५ मधून १८० जणांना वाचविण्यात आले आहे. सोमवारी रात्री सातच्या सुमारास हे जहाज बुडाले होते.
आता उर्वरित ९३ जणांचा शोध सुरु होता त्यातील १४ जणांचे मृतदेह आता सापडले आहेत. अशी माहिती नेव्हीचे प्रवक्ते मेहुल कर्णिक यांनी दिली आहे. दुसरे जहाज बार्ज GAL कन्स्ट्रक्टरवर १३७ जण होते, यातील सर्वांना मंगळवारी रात्री उशइरापर्यंत वाचवण्यात आले आहे.
या जहाजालाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. GAL कन्स्ट्रक्टर जहाज हे कोलावा पॉइंटपासून ४८ नॉटिकल मैल अंतरावर अडकले होते. या जहाजाला मदत करण्यालाठी आपत्कालीन नौका वॉटर लीलीला पाठविण्यात आले होते.
याशिवाय सागर भूषण आणि एसएस-३ (SS-3) या दोन जहाजांवरील प्रवासीही सुरक्षित असल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम