अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन दरमहा उशिरा होत असल्याने, या प्रकरणी चौकशी करुन सीएमपी प्रणालीद्वारे वेतन वेळेत मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे व आमदार संजय केळकर यांनी नाशिक विभागीय आयुक्त व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार व नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन दरमहा उशिरा होत आहे. राज्य शासन (शिक्षण संचालक कार्यालय पुणे) यांच्याकडून शिक्षकांचे दरमहा वेतन अनुदान वेळेवर प्राप्त होते.
मात्र जिल्हा परिषद कार्यालयामार्फत पगार संबंधीची प्रत्यक्ष कार्यवाही उशिरा होते. यामुळे शिक्षकांचे घर कर्ज, वाहन कर्ज व इतर कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने त्यावर जादा व्याज भरावे लागत आहे. मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार,
कौटुंबिक अडचणी सोडविण्यासाठी वेळेवर वेतन न मिळाल्याने शिक्षकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचार्यांच्या गलथान कारभाराचा फटका शिक्षकांना बसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मासिक वेतन शिक्षण अधिकारी यांच्याकडून अहमदनगर सेंट्रल बँकेच्या खात्यात जमा केले जाते.
त्या ठिकाणी ही रक्कम किमान सात-आठ दिवस बँक खाती वर्ग न करता स्वतःकडे राखून ठेवते. शिक्षणाधिकारी यांना शिक्षकांचे पगाराचे खाते सेंट्रल बँक मध्ये न ठेवता स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सुरु करण्यासाठी शिक्षक संघटनांनी गेली वर्षभर मागणी केली होती.
यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशित केलेले असतानाही पगाराचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत वर्ग करण्यात आलेले नाही. या प्रकरणाची चौकशी करुन सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे पगार वेळेत करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन वेळेत होण्यासाठी शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहकले, उपाध्यक्ष संजय शेळके, नाशिक विभाग अध्यक्ष राजेंद्र जायभाये, मिलींद तनपुरे, बाबा पवार, खंडेराव उदे, श्रीकृष्ण खेडकर, राजू इनामदार, जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, विकास डावखरे,
संजय शिंदे, आर.पी. रहाणे, अविनाश निंभोरे, राजेंद्र मुंगसे, संतोष अकोलकर, दिलीप औताडे, मंजूताई पवार, महीला आघाडी प्रमुख मिनाक्षी तांबे, जया आंबेकर, भाऊ ढोकरे, कल्याण राऊत, सुनिल पवळे, अल्ताफ शहा, बाबुराव कदम आदी प्रयत्नशील आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम