पारनेर :- तहसिलदार व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृह परिसरातून वनकुटे येथील चार वाळू तस्करांनी पळवला. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली.
पोलिस अधीक्षक ईशू सिंंधू यांनी वाळूतस्करी बंद करण्याच्या सूचना प्रत्येक ठाण्याच्या अधिकाऱ्यास दिल्याने वाळूतस्करी थंडावली होती. विधानसभा निवडणुकीत पोलिस तसेच महसूल यंत्रणा व्यग्र झाल्याने अवैध वाळूचा उपसा पुन्हा सुरू झाली. निवडणूक झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
तहसीलदार देवरे यांनी वाळूतस्कराचा जेसीबी ताब्यात घेऊन टाकळी ढोकेश्वर येथील विश्रमागृहाच्या आवारात लावला. प्रवेशद्वाराला कुलूपही लावण्यात आले. तहसीलदार निघून गेल्यानंतर मध्यरात्री तस्करांनी जेसीबी पळवला. तो नेताना पेव्हिंग ब्लॉक, तसेच फरशांचेही नुकसान केले.
वनकुटे येथील टायगर या टोपणनावाने परिचित वाळूतस्कराचा हा जेसीबी असून त्याने इतर तस्करांच्या मदतीने जेसीबी पळवल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून वाळूतस्करांच्या दोन गटांमध्ये संघर्ष सुरू असून एकमेकांच्या तस्करीची प्रशासनास टीप देण्याचे काम त्यांच्यात सुरू आहे. त्यातून मोठा संघर्ष होण्याची भीती आहे.