फक्त टाळेबंदी व निर्बंधापुढे प्रशासनाचे डोके चालण्यास तयार नाही -अ‍ॅड. गवळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-कोरोनापेक्षा त्याच्या प्रतिबंधासाठी शहरात घालण्यात आलेले निर्बंध अधिक जालिम ठरत असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी फक्त टाळेबंदी व निर्बंधापेक्षा योग्य नियोजनाची आवश्यकता असून, महापालिका व पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना दंड करुन स्वत:ची पाठ थोपाटण्यापेक्षा अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी नियोजन करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.

महापालिका प्रशासनाने शहरात अत्यावश्यक सेवा असलेल्या किराणा दुकान व फळ, भाजी-पाला विक्रीवर निर्बंध आणून नागरिकांना उपाशी पोटी ठेवण्याचा घाट घातला आहे. दारु विक्री सर्रास सुरु असून, किराणा व भाजी-पाला विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी काय चांगले आणि काय वाईट? यामध्ये फरक करण्यात देखील प्रशासनाला कळणे अवघड झाले आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन नागरिक काही कामानिमित्त घरा बाहेर पडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन त्यांची कोरोना चाचणी करीत आहे.

मात्र सध्या कोरोना चाचणीपेक्षा प्रशासनाने लस देण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. टाळेबंदी व निर्बंध किती दिवस चालणार? हा प्रश्‍न उपस्थित करुन काही दिवसांनी नागरिकांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घरा बाहेर पडावेच लागणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभाराने फक्त सर्वसामान्य नागरिकांवर निर्बंध लादले जात असून, हा प्रकार थांबण्याची गरज आहे. नागरिकांचे तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सुरु आहे. सहनशील नागरिकांच्या उद्रेकाचा अंत प्रशासनाने पाहू नये.

काही देशांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन निर्बंध शिथील केले आहे. अशा देशांचा अभ्यास करुन प्रशासनाने पुढची ध्येय-धोरण ठरवून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. मात्र फक्त टाळेबंदी व निर्बंधापुढे प्रशासनाचे डोके चालण्यास तयार नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe