बाळ बोठेने ‘त्या’ मोबाईलवरून वकिलांना केले ‘इतके’ कॉल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या कोठडीत सापडलेल्या मोबाईलवरून वकिलांशी तीन कॉल केल्याची माहिती तपासात समाेर आली आहे.

याप्रकरणी बोठे त्याच्यावर याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बोठे सध्या पारनेर उपकारागृहात असून तेथील कोठडीत सापडलेल्या दोन मोबाईलमधून बोठेने वकिलांना फोन केल्याची पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिस आता त्या वकिलांकडे चौकशी करणार आहेत. कोठडीत फोन वापरण्यास बंदी आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय वकिलांना आरोपीशी संपर्क ठेवता येत नसतानाही हा संपर्क कसा झाला, याचाही तपास पोलिस करणार आहेत.

गेल्या महिन्यात दोन आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत आठ जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बोठे याला या गुन्ह्यात सहभागी करून घेण्यात आले आहे.

आणखी काही आरोपींनी मोबाईलचा वापर केल्याचे समोर आले असल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली. पोलिसांनी दोन्ही मोबाईलवरून झालेल्या कॉलची माहिती घेतली. बराकीतील आरोपींनी सुमारे ६० ते ७० कॉल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यात बोठेने तीन कॉल केल्याचे आढळून आले. त्याने हे कॉल वकिलांना केल्याची माहिती समोर आली. बोठे याने कोणत्या वकिलांना व कशासाठी कॉल केले? त्यातून त्यांचे काय बोलणे झाले? याचा शोध घेतला जाणार असल्याचे निरीक्षक बळप यांनी सांगितले.

कायदेशीर मार्गदर्शनासाठी आरोपीला वकिलांशी संपर्क साधण्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते. शिवाय कोठडीतून आरोपीला फोनद्वारे बाहेर संपर्क करता येत नाही, याची माहिती असूनही वकिलांनी बोठेशी कसा संवाद केला? याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe