अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर तालुक्यातील हनीट्रॅप प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आरोपी बापू बन्सी सोनवणे याला शुक्रवारी न्यायालयाने 24 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नगर तालुक्यातील जखणगाव येथे एका 30 वर्षीय महिलेने एका बागतदाराला नाजूक संबंधाचे आमिष दाखवून त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी महिलेसह तिचा साथीदार अमोल मोरे याला अटक केली होती.
महिलेचा वापर करीत हनीट्रॅप ! कल्याण रस्त्यावरील जखणगाव येथील महिलेचे हनीट्रॅप चालविणारे संदीप खेसे आणि बापू सोनवणे हे सख्खे मेहुणे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
बापू सोनवणे याची सख्खी बहिण संदीप खेसे याला दिली आहे. सख्खे मेहुणे असतानाही या दोघांनीही या महिलेसोबत शय्यासोबत केली आणि शेवटी या महिलेचा वापर करीत हनीट्रॅप चालविल्याचे आता उघड झाले आहे.
धक्कादायक खुलासे :- नगर तालुक्यातील बहुचर्चित हनीट्रॅप प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले असून, या प्रकरणात हिंगणगावचा व्यावसायिक व रेकॉर्डवरील गुन्हेगार बापू सोनवणे याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सोनवणे हा हायप्रोफाईल लोकांची नावे संबंधित महिलेला सूचवित होता. त्यानुसार सदर महिला संबंधितांना जाळ्यात ओढत होती.
फॉरच्युनर गाडीदेखील जप्त :- पोलिसांनी सोनवणे याच्या मुसक्या आवळतानाच त्याची आलिशान फॉरच्युनर गाडीदेखील जप्त केली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे.
या हनीट्रॅप प्रकरणात ज्या महिलेला अटक केली आहे तिच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची माहिती आता पुढे येत आहे. पोलिस आता या गुन्ह्यासह तीन कोटी रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये कोण कोण सामील आहे, याचा शोध घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम