पारंपरिक व्यवसाय सोडून पोटासाठी त्यांनी निवडला वेगळा पर्याय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे.

यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सलून व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहे. व्यवसायच बंद असल्याने कुटुंबाची होणारी वाताहात पाहता आता या व्यावसायिकांनी पारंपरिक व्यवसायला फाटा देत उपजीविकेसाठी व कुटुंबाचे पोट भरण्यासाठी शेतमजुरी, भाजीपाला, फळे विक्री करू लागले आहे.

दरम्यान गेल्यावर्षी कोरोना काळातील लॉकडाऊनचा सलून व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. त्यामुळे काहींवर व्यवसाय बंद करण्याचीही वेळ आली होती.

त्यावेळी जवळपास पाच ते सहा महिने व्यवसाय बंद होता. दिवाळीनंतर कोरोनाबाबतचे नियम पाळत सलून व्यवसाय सुरू होता. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि शासनाने पुन्हा लॉकडाऊन सुरू केला.

त्यामध्ये सलून व्यावसायिकांवरही निर्बंध आले. त्यामुळे व्यावसायिक पुन्हा हतबल झाले. पुन्हा दुकाने बंद झाल्याने उपजीविका कशी करायची हा प्रश्न उद्भवला.

कर्जाचे हप्ते, दुकानभाडे, वीज बिल भरायचे कसे? हा प्रश्नही त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे काहींनी आता शेतमजुरी, भाजीपाला विक्री, शेळीपालन, कुक्कुटपालन याकडे मोर्चा वळविला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News