लखनऊ – भगवान राम मुसलमानांचे पूर्वज असल्याचा दावा करत शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
रिझवी यांनी गुरुवारी सांगितले की, अयोध्येतील राममंदिर जगभरातील रामभक्त आणि भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भगवान राम सर्व मुसलमानांचे पूर्वज आहेत.
ते म्हणाले की, अयोध्येतील रामजन्मभूमी वाद संपवण्यासाठी बोर्डाने मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडत अयोध्येत राममंदिर उभारण्याची बाजू घेतली होती.
न्यायालयाने दिलेला निकाल हा एकमेव पर्याय यातून मार्ग काढण्यासाठी होता. आता भारतात रामजन्मभूमीच्या जागेवर जगातील सर्वात सुंदर राममंदिर उभारण्याची तयारी होत आहे.
राममंदिराच्या उभारण्यासाठी वसीम रिझवी फिल्म्सकडून ५१ हजार रुपये रामजन्मभूमी न्यासाला बोर्डाचे अयोध्या जिल्हा प्रभारी अश्फाक हुसेन जिया यांच्या माध्यमातून देण्यात येतील.
अयोध्येत जेव्हा मशिदीची उभारणी होईल त्या वेळीही शिया वक्फ बोर्डाकडून मदत देण्यात येईल, असेही रिझवी यांनी सांगितले.