पंतप्रधानांकडून बळीराजाला दिलासा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान विस्कळीत झालेले असताना शेतकरी बांधव देखील या दृष्टचक्रातून सुटलेले नाही.

कोरोनामुळे संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी बांधव आधीच चिंताग्रस्त झालेले होते. त्यातच रासायनिक खत निर्मिती करणार्या कंपन्यांकडून खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले होते.

मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांच्या हिताचा विचार करून रासायनिक खतांच्या किंमतीवरील अनुदानात वाढ करून खतांच्या किंमती कमी केल्याची माहिती इफकोचे जनरल बॉडी प्रतिनिधी व शेतकरी सहकारी संघ कोपरगाव संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.

कोल्हे म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून तीव्रतेने वाढत असून त्याचा फटका शेतकरी बांधवांनाही बसला.

लॉकडाऊनमुळे पिकवलेल्या मालाची विक्री कशी करावी, या विवंचनेत असताना वारंवार बंद होत असलेल्या बाजार समित्यांमुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडले असून उत्पादन खर्चही कसा निघेल यामुळे शेतकरी चिंचातूर झाले होते.

त्यातच रासायनिक खतांची निर्मिती करणाऱ्या विविध कंपन्याकडून खतांच्या किमंतीमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे त्यात भर पडली होती. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खतांच्या अनुदानात १४० टक्के वाढ करून शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला.

डीएपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या फॉस्फोरिक अॅसिड व अमोनियाच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्यामुळे खतांचे दर वाढले. मात्र दरवाढीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe