अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- दूध उत्पादक शेतकरी दूध संघांचा पाया आहे. संकटात मदत करणे येथील सहकारी संस्थांची संस्कृती आहे. कोरोना पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी चारा व बियाणे मोफत देत राजहंस दूध संघाने कायम शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुका दुध संघात दूध उत्पादकांना मोफत बियाणे वाटप प्रसंगी मंत्री थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, महानंद व राजहंसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, जी. एस. शिंदे यावेळी उपस्थित होते. गोरक्ष नवले, संभाजी गुंजाळ, भाऊसाहेब राऊत,
बाळासाहेब आगलावे व अर्जुन राऊत यांना मंत्री थोरातांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात चारा बियाणे वाटप करण्यात आले. मंत्री थोरात म्हणाले, दुध व ऊस शाश्वत उत्पादनाचे साधन आहे.
दूध व्यवसायातून ग्रामीण भागात क्रांती झाली. देशमुख म्हणाले, कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वच उद्योगांसह दुग्ध व्यावसायाला मोठा फटका बसला.
जनजीवन विस्कळीत झाल्याने दुधाची मागणी घटली. यामुळे व्यवसाय तोट्यात आला. दूध उत्पादकांच्या मदतीसाठी, राजहंस दूध संघाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे चारा व बियाणांची मागणी करत ११० मेट्रिक टन बियाणे प्राप्त केले.
मका, ज्वारी, बाजरी, गवत या चारा पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना मोफत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम