रुग्‍णालयाची माहीती एका क्लिकवर मिळण्‍यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील नागरीकांसाठी स्‍वतंत्र अॅप्‍स – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोव्‍हीड संकटामध्‍ये रुग्‍ण आणि त्‍यांच्‍या नातेवाईकांना रुग्‍णालयाची माहीती एका क्लिकवर मिळण्‍यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील नागरीकांसाठी स्‍वतंत्र अॅप्‍स उपलब्‍ध करुन दिले असल्‍याची माहीती भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

तालुक्‍यात असलेली कोव्‍हीड रुग्‍णालय, कोव्‍हीड केअर सेंटर यांची माहीती रुग्‍ण आणि त्‍यांच्‍या नातेवाईकांना सहज मि‍ळत नाही. त्‍यामुळे नातेवाईकांचा वेळ रुग्‍णालय आाणि बेड मिळविण्‍यासाठी जातो.

मागील काही दिवसात निर्माण झालेल्‍या परिस्थितीच्‍या पार्श्‍वभूमिवर शिर्डी विधानसभा मतदार संघातील नागरीकांची धावपळ कमी व्‍हावी म्‍हणून, रुग्‍णालयांची परिपूर्ण माहीती असलेले अॅप्‍सची सुविधा सुरु होईल.

याबाबतची सर्व प्रक्रीया सुरु असून, थोड्याच दिवसात नागरीकांना आपल्‍या मोबाईलवर या अॅप्‍सच्‍या माध्‍यमातून रुग्‍णालयांची माहीती अतिशय सोप्‍या पध्‍दतीने मिळणार असल्‍याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

या अॅप्‍समध्‍ये प्रामुख्‍याने राहाता तालुक्‍यातील सरकारी आणि खासगी रुग्‍णालयात असलेले बेड, ऑक्‍सीजन बेड, व्‍हेन्‍टीलेटर बेड तसेच उपलब्‍ध असलेल्‍या सुविधांची माहीती प्रत्‍येक दिवशी अपडेट केली जाणार आहे.

भविष्‍यात या अॅप्‍स च्‍या माध्‍यमातून लसीकरण मोहीमेची माहीतीही नागरीकांना मिळेल. गावनिहाय, तसेच शहरांमध्‍ये प्रभाग निहाय नागरीकांना लसीकरणाची माहीती दररोज उपलब्‍ध होईल. असे सांगुन आ.विखे पाटील म्‍हणाले की,

या अॅप्‍सच्‍या सहकार्याने तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्‍या सहकार्याने मतदार संघातील कुटूंबाचे सर्वेक्षण करुन, ६ महिन्‍यात नागरीकांचे लसीकरण पूर्ण करण्‍याचा मानस असून, लसीकरण करणारा शिर्डी विधानसभा मतदार संघ अव्‍वल ठरेल असेही आ.विखे पाटील म्‍हणाले.

कोव्‍हीड नंतर म्‍युकरमायक्रोसिस आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याबाबत नागरीकांचे प्रबोधन व्‍हावे म्‍हणून या अॅप्‍सच्‍या माध्‍यमातून या नवीन आजाराची लक्षणे आणि उपचारांबाबतची माहीती दिली जाणार असून,

शिर्डी संस्‍थानच्‍या रुग्‍णालयात स्‍वतंत्र विभाग आणि तंज्ञ डॉक्‍टरांचा टास्‍कफोर्स निर्माण करण्‍याबाबतही आपण सुचित केले असल्‍याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले. या संदर्भात खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी राहाता तालुक्‍यातील सर्व सरकारी आणि खासगी डॉक्‍टरांसमवेत संवाद साधला.

तयार केलेल्‍या अॅप्‍ससाठी रुग्‍णालयांची माहीती लसीकरण मोहीमेसाठी संपूर्ण सहकार्य करण्‍याची ग्‍वाही वैद्यकीय व्‍यवसायीकांनी दिली. याप्रसंगी तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास आधि‍कारी समर्थ शेवाळे, प्रभारी तालुका आरोग्‍य आधिकारी डॉ.संजय गायकवाड,

गणेश कारखान्‍याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, उपाध्‍यक्ष अॅड.रघुनाथ बोठे, सभापती सौ.नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे आदि उपस्थित होते.