आणि तो चोरीचा प्रयत्न फसला… चोरटे गाडीसह माल टाकून पळाले !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील चौधरवाडी शिवारात १५ ते १६ मे दरम्यान ३५ हजार रुपये किंमतीची ॲल्युमिनियमची तार चोरुन नेल्याची घटना ताजी असताना २१ मे रोजी पहाटे पुन्हा चोरटे तार चोरी करण्यासाठी त्याच ठिकाणी आले होते.

मात्र, पोलीस व ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चोरटे गाडी व चोरीचा माल टाकून पळाले. आता या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आवाहन आश्वी पोलीसांपुढे आहे.याबाबत विभासकुमार महतो यांनी दुसऱ्यांदा दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,

चौधरवाडी शिवारातील टॉवर (क्रंमाक १०३ ते १०४) ची ६४० चौरस एम. एम. जाडीची व १५ हजार रुपये किमंतीची ॲल्युमिनीयम तार २१ मे रोजी ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक अनोळखी गाडी भरधाव वेगाने गेल्यामुळे दुसऱ्यादा ॲल्युमिनियम तार चोरी करण्यासाठी चोरटे आल्याची चाहूल स्थानिक नागरीकांना लागली होती. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यामध्ये दगड लावून आश्वी पोलिसांना चोरटे आल्याची माहिती दिली.

यावेळी गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. त्याचदरम्यान चोरटे भरधाव वेगाने आपले वाहन घेऊन येत असताना रस्त्यावर दगड लावलेले बघून थबकले. यावेळी नागरिकांनी गाडीचा पाठलाग सुरु केल्याने चोरट्यांनी गाडी मागे घेऊन मोकळ्या शेतातून गाडी पळवली.

परंतु नांगरलेल्या रानात गाडी फसल्याने गाडी तेथेच सोडून पाच ते सहा चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची थरारक घटना घडली आहे. यावेळी घटनास्थळावरुन महिंद्रा बोलेरो (एम.एच.०६ बी.जी. ०६६०) हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए.डी. शिंदे करत असून या चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आश्वी पोलीसांसमोर उभे ठाकले आहे. तर चोरट्यांबाबत धागेदोरे पोलीसांच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे.