सावेडीत दुकान लुटणाऱ्या चोरटयांना तोफखाना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- दोन दिवसांपूर्वी सावेडीतील एक दुकान चोरटयांनी लुटल्याची घटना घडली होती. या चोरट्यांना तोफखाना पोलिसांनी गजाआड केले आहे.

याप्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चौघांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. संदीप ऊर्फ संजु रामचंद्र गायकवाड (वय 28),

मंगेश ऊर्फ अंकल संजु पवार (वय 23), शर्मा हुरमास काळे (वय 35 तिघे रा. प्रेमदान हाडको, सावेडी), राम सुदाम सौदागर (वय 23 रा. वैदुवाडी, भिस्तबाग) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या 2 दिवसापूर्वी सावेडी उपनगरातील पंचशील हॉटेल शेजारी असलेल्या महावीर सिरँमिक्स बिल्डींग मटेरियल सप्लायर्सचे दुकान फोडून सहा लाख 48 हजार 800 रूपये किंमतीचे प्लंबिंग व बिल्डींगचे सामान अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते.

या प्रकरणी दुकानाचे मालक अरविंद अमृतलाल मुथ्या (रा. सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी अधिक तपास केला असता घरफोडी करणार्‍या काही संशयितांची नावे त्यांना खबर्‍याकडून समजली. मेढे यांनी एक पथक तयार करून चौघांना नगर शहरातील विविध ठिकाणाहून अटक केली.

अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. त्यांच्यासोबत घरफोडी करणार्‍या अन्य तिघांची नावे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. परम्या गायकवाड, लक्ष्मण कुर्‍हाडे, आकाश कुर्‍हाडे असे या आरोपींचे नावे आहेत. ते पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.