जामखेड : तालुक्यातील धर्मात्मा मल्टिस्टेट क्रेडिट संस्थेच्या शाखेत आठ जणांनी ५८० ग्रॅम खोटे सोने खरे असल्याचे तारण ठेवून संस्थेची सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक केली. यासाठी संस्थेच्या सोने मुल्यमापकाने त्यास मदत केली यावरून एकंदर नऊ जणांवर संस्थेच्या मुख्य व्यवस्थापकांनी जामखेड पोलिसात तक्रार दाखल केली.
यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. याबाबत जामखेड पोलिसात धर्मात्मा मल्टिस्टेट क्रेडिट को आँप सोसायटी लि. शेवगावचे मुख्य व्यवस्थापक नंदकिशोर झिरपे यांनी तक्रार दिली की, संस्थेच्या आठ शाखा कार्यरत असून जामखेड येथील शाखेत १६ मार्च २०१७ ते ५ जून २०१८ दरम्यान ५८० ग्रॅम ४५० मिली खोटे सोने तारण ठेवून त्यावर ८ लाख २६ हजार रुपये आठ जणांनी घेतले.
यामध्ये संतोष पाटील यांनी ३६ हजार, सुनिल कोळपकर १ लाख ४९ हजार, भाऊसाहेब पवार १ लाख, सुरेखा सुरवसे ८० हजार, रामदास मानमोडे ७५ हजार, मुमताज मणियार १ लाख ४९ हजार, कानिफनाथ मोहळकर १ लाख ४७ हजार, राजु पवार ९० हजार संस्थेच्या शाखेतून घेतले.
सदर खोटे सोने तारण असताना संस्थेचे सोने मुल्यमापक संजय शंकर महामुनी यांनी ते सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले हा सर्व प्रकार संगनमताने घडला आहे.
सोने तारण ठेवलेले वरील आठ कर्जदार सोने सोडवण्यासाठी आले नाही यामुळे दि. ६ आँगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सदरील सोन्याचा लिलाव ठेवला यावेळी सोन्याच्या सिलबंद पिशव्या लिलावास उपस्थित असलेल्या सोने मुल्यमापकाने तपासले असता ते खोटे सोने असल्याचे सांगितले.
जामखेड येथील संस्थेच्या शाखेत आठ जणांनी खोटे सोने तारण ठेवले यास संस्थेचा मुल्यमापक याने ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले त्यामुळे संस्थेची सव्वाआठ लाख रुपयांची अर्थिक फसवणूक केली आहे अशी तक्रार दाखल केली.
यावरून पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी नऊ आरोपींवर गुन्हा दाखल करून यातील आरोपी संजय महामुनी, कानिफनाथ मोहळकर, भाऊसाहेब पवार, संतोष पाटील, राजु पवार, मुमताज मणियार या सहाजणांना अटक केली