मुंबई : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. भाजपाविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे नव्या जोमाने कामाला लागा, विजय आपलाच आहे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केले.
दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अकोला, वाशीम, धुळे, नंदूरबार आणि नागपूर या जिल्ह्यातील काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, प्रकाश सोनावणे, अभिजीत सपकाळ, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.
या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीबाबत आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार घेऊन जनतेपर्यंत जावे आणि संघटनात्मक बांधणी करावी.
काँग्रेसचा विचार हा सर्वसमावेशक आणि शाश्वत आहे. सर्वांनी मेहनत घेऊन काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवल्यास काँग्रेसला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.