राहाता :- तालुक्यातील ममदापूर येथे काल पहाटेच्या सुमारास अलीबाबा दग्र्यालगत असलेल्या इस्माईल शहा यांच्या घरी जबरी चोरी झाली. यात ५० हजार रुपये रोख रक्कम व दागिने, असा मिळून एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
ममदापूर गावातील अलीबाबा दग्र्याशेजारी रहात असलेल्या काही घरांची काल रात्री कोणीतरी बाहेरून कडी लावली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर रहिवाशांनी आरडाओरड केली. त्यानंतर आवाज ऐकून शेजारील लोकांनी दरवाजा उघडला. कोणी असे कृत्य केले, याची चर्चा सुरू असताना या घरांशेजारीच असलेल्या इस्माइल शहा यांच्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत व घरातील सामान अस्ताव्यस्त घरात व बाहेर पडलेले दिसले.
त्यामुळे हा सर्व प्रकार चोरीचा असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. बाहेरगावी गेलेले इस्माइल शहा व पोलिसांना स्थानिक नागरिकांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटना घडण्याच्या तीन दिवस अगोदर हे कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेले होते, याची पुरेपूर खबर चोरट्यांना असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. चोरट्यांनी घरातील ५० हजारांच्या रोख रकमेसह कानातील झुबे, मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, चांदीच्या बांगड्या, असा दोन तोळ्याचा मुद्देमाल लंपास केला.
घटनेची माहिती पोलीस पाटील ज्ञानदेव कळमकर, सरपंच विजय जवरे यांनी लोणी पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल देवचक्के, नगर येथील सहायक फौजदार आर. आर. विरकर यांच्यासह ‘मिस्का’ नावाचे श्वान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या श्वानाने घटनास्थळाहून सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरापर्यंत एका शेतात पडलेल्या काही वस्तुंपर्यंत जात नंतर ममदापूर-कोल्हार रस्त्यावर माग काढला.
शहा यांची परिस्थिती हलाखीची असून, गावात हातगाडीवर अंडापावचा ते व्यवसाय करतात. त्यांना एकच मुलगी असून, मुलीच्या शिक्षणसाठी त्यांनी थोडी रक्कम बाजूला ठेवली होती. याच रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला.