अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोरोनाची लाट ओसरल्यावर रिकाम्या कोविड सेंटरची पाहणी करणाऱ्या खासदार डॉ. सुजय विखे यांनी लसीकरणाबाबत ज्ञान पाजळू नये.
राजकारण करण्याऐवजी ४५ पुढील वयोगटासाठी केंद्र सरकारकडून किती लस येतात, याचा अभ्यास त्यांनी करावा, असा सल्ला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
राहुरी तालुक्यातील लसीकरण, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेल्या रुग्णवाहिकेचा विषय केंद्र सरकारचा असताना राज्य सरकारमधील मंत्री स्वत:ची हौस भागवण्यासाठी हस्तक्षेप करत असल्याची टीका करत राज्य सरकारने लस उपलब्ध करून द्यावी,
मगच हस्तक्षेप करावा, असे खासदार डाॅ. विखे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता सुनावले होते. मंगळवारी रात्री राज्यमंत्री तनपुरे यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन विखेंना प्रत्युत्तर दिले.तनपुरे म्हणाले, कोरोना महामारी सुरू झाल्यापासून खासदार विखे एकदाही राहुरी तालुक्यातील कोविड सेंटरकडे फिरकले नाहीत.
कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी आम्ही शासकिय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले. कृषी विद्यापीठाच्या वातानुकूलित कक्षात बसून लसीकरणावर राजकारण करण्याऐवजी केंद्राकडून राज्यात तुटपुंज्या लशी येतात, याकडे खासदार या नात्याने विखे यांनी लक्ष द्यावे.
कोविड लसीचा पुरेसा पुरवठा करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले. इतर देशांत मोठ्या प्रमाणात कोविड लस उपलब्ध झाली असताना केंद्र सरकारला दूरदृष्टी नसल्याने आपल्याकडे पुरेशी लस उपलब्ध होऊ शकली नाही, अशी टीका राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम