अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- सध्या देशात कोरोना लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने याच पार्श्वभूमीवर देशातील एका कंपनीसोबत मोठा करार केला आहे.
हैदराबादमधील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल-ईकडून मोदी सरकार कोरोना लसीचे 30 कोटी डोस खरेदी करणार आहे.या लसींचे उत्पादन ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान घेतले जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी कंपनीला 1500 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंटदेखील केले आहे.
बायोलॉजिकल-ई कंपनीचे डोस ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तयार होणार असल्याची माहिती आहे.सध्या या लसीची चाचणी तिसऱ्या फेज मध्ये आहे. या आधीच्या दोन फेजमध्ये लसीचे रिपोर्ट प्रभावी आले आहेत.
बायोलॉजिकल-ई कंपनीकडून तयार करण्यात येणारी लस ही आरबीडी प्रोटिन सब-युनिट लस असून येत्या काही महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिननंतर ही दुसरी स्वदेशी लस आहे. केंद्र सरकारला देशात जास्तीत-जास्त लसीकरण करण्यासाठी भरपूर लसींची गरज आहे. म्हणूनच केंद्र सरकार बायोलॉजिकल-ईला वेळोवेळी मदत करत आहे.
या अंतर्गत सरकारने कंपनीला क्लिनिकल ट्रायलसाठी 100 कोटी रुपये दिले असून, इतर रिसर्चसाठी आणखी मदत पुरवणार आहे. सध्या देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा लसीकरणाच्या कार्यक्रमात वापर केला जात आहे.
रशियाच्या स्पुटनिक व्ही ची आयात करण्यात आली असून ती लवकरच वापरात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन लस फायझरच्या वापरालाही या महिन्यापर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम