अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर होत असताना यावर्षी 2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कार्यवाही सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले आहे.
मागील वर्षी 2020 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करुन ते प्रदान केले. मात्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. मात्र यावर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कोणतीही कार्यवाही सुरु करण्यात आलेली नसून, सदर पुरस्कार जाहीर करण्याची मागणी शिक्षक परिषदेने लाऊन धरली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
मागील वर्षी केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांची निवड करुन त्यांना पुरस्कार प्रदान केलेले आहेत. यावर्षीही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रायलाकडून आवेदन पत्रे मागवण्यात आलेली आहेत. यासंदर्भात राज्याच्या शिक्षण संचालकांनी दि.1 जून रोजी माहिती करीता, प्रसिद्धीकरिता एक पत्रही निर्गमित केलेले आहे.
मात्र राज्य सरकार राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यास पुढाकार घेत नसल्याने ही खेदाची गोष्ट असून, शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. कोरोना महामारीत शिक्षकांची ऑनलाईन शिक्षण देण्याचे कार्य सुरु आहे. शासनाच्या सर्व उपक्रमातही शिक्षकांचा सहभाग आहेच. शिक्षकांचे योगदान सुरु असताना त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारांपासून का वंचित ठेवले जात आहे?
असा प्रश्न राज्यभरातील शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. यावर्षीही राज्य स्तरावर शिक्षक पुरस्कार देण्याबाबत कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. निवड समिती तसेच निवड प्रक्रियेची कार्यवाहीसुध्दा अद्याप घोषित करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मागील वर्षीच्या देय असलेल्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड करणे व यावर्षीच्या शिक्षक पुरस्कारांची निवड स्वतंत्रपणे करण्यात यावी.
दोन्ही वर्षीच्या पात्र असलेल्या शिक्षकांसाठी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही आयोजन करता येईल, पण निवड करण्याची प्रक्रिया सुरु करावी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीचा लाभासह इतर लाभही तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण,
इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम