अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ १४ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली आहे.
खुनाची कबुली :- या घटनेतील आरोपीने पंधरा दिवसांपूर्वी आणखी एक खून केला. त्यात तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिस चौकशीत आरोपीने राहुरी फॅक्टरी येथे मित्राच्या मदतीने केलेल्या खुनाची कबुली दिली.
घरच्यांनी त्याला मामाकडे पाठवले आणि…
ज्ञानेश्वर ऊर्फ भय्या गायकवाड व केतन लोमटे (दोघेही शिरुर कासार, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. शीतल भामरे (गाडेकर मळा, नाशिक) असे मृत तरूणीचे नाव आहे.
ज्ञानेश्वर मूळचा भातकुडगावचा (ता. शेवगाव) रहिवासी. गावातील मुलींची छेड काढत असल्याने घरच्यांनी त्याला मामाकडे शिरूर कासार येथे पाठवले.
डोक्यात दगड घालून खून :-
सोशल मीडियातून त्याची शीतल भामरे या विवाहितेची ओळख झाली. दोन मुले असताना तिने सहा महिन्यांपूर्वी शिरूर कासार गाठले. दोघे “लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले.
चारित्र्याच्या संशयावरून त्रास सुरू झाल्याने ती परत नाशिकला निघाली. नाशिकला जाताना मित्र केतनच्या मदतीने ज्ञानेश्वरने शीतलचा डोक्यात दगड घालून खून केला.
सराफ व्यावसायिकास घरी बोलावत केला दुसरा खून :-
ज्ञानेश्वरने एप्रिल महिन्यात दुसऱ्या मुलीशी लग्न केले. सराफ व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे (वय २५, शिरुर कासार) याला दागिने खरेदीकरिता घरी बोलावत त्याचा खून केला.
भीतीपोटी आरोपीच्या मामांची आत्महत्या !
विशालचा मृतदेह आरोपीने मामाच्या दुचाकीवरून भातकुडगाव येथे स्वतःच्या शेतात नेऊन पुरला.मामाच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला.
भीतीपोटी आरोपीचे मामा अजिनाथ गायके (शिरुर कासार) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेयसी शीतलचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.
खून प्रकरणात अटक करण्यासाठी न्यायालयात अर्ज
विशाल कुलथे यांच्या खूनप्रकरणात आरोपी ज्ञानेश्वर पोलिस कोठडीत आहे. दोन दिवसांनी कोठडी संपल्यावर आरोपीला राहुरी फॅक्टरी येथील खून प्रकरणात अटक करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम