अहमदनगर :- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पशुधनाला दिलासा देण्यासाठी येत्या तीन दिवसांत छावणीसाठी दाखल परिपूर्ण प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची मोहर उमटणार आहे.
याच आठवड्यात छावणी सुरू होईल, अशी ठाम ग्वाही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.गतवर्षीच्या पाणकाळात जिल्ह्याच्या शिवाराकडे पावसाने पाठ फिरवली. खरीप पाठोपाठच रब्बीचा हंगामही बुडाला.
घटलेल्या जलस्तरामुळे शेतकऱ्यांच्या सालचंदीचा आधार असणाऱ्या खळ्या-दळ्यांना काच लागला, तसे पशुधनाच्या गव्हाणी पुढे चाराटंचाईचे भेसूर संकट उभे ठाकले. जिल्ह्यात एकूण लहान-मोठे सत्तावीस लाख जनावरे आहेत.
यापैकी गाय, बैल, म्हैस या प्रवर्गातील पशुधनाची संख्या तब्बल सतरा लाख एवढी आहे. भेसूर दुष्काळाने चाऱ्याच्या गंजी आक्रसल्या. पावसाच्या जीवावर येणारा माळा मुरडनाचा व बांधा काठचा चारा नसल्यात जमा.
अशा परिस्थितीत गोठ्यात असलेल्या दावणीला बांधलेल्या पशुधनाच्या गव्हाणीत टाकायचं काय आणि शेतापोताचा आधार असणारे पशुधन जोपासायचं कसं? ही चिंता राबणाऱ्या वस्त्यांना लागली नसेल तरच नवल!
जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर पूर्वीच जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर केला. टंचाई तीव्र होत असतानाच शेतशिवारातील वेदनेचा बोभाटा मोठा झाल्याने भर हिवतात राज्य शासनाने दुष्काळाची घोषणा करीत जिल्ह्यातील तब्बल १४२१ गावे दुष्काळी घोषित केली.
पशुधनासाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी तीव्र होत असल्याचे पाहून परिस्थितीचा अंदाज घेत राज्य शासनाने २५ जानेवारी रोजी चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी दिली
तालुकानिहाय चारा छावणी प्रस्ताव.
नगर ६२, नेवासा २, पारनेर ३९, श्रीगोंदा ६५, कर्जत १२९, जामखेड ८०, पाथर्डी १०३, शेवगाव ४९, राहुरी ४ व संगमनेर १ असे ५३४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी अपूर्ण असलेल्या प्रस्तावांची पूर्तता, छाननी, मंडळ अधिकाऱ्यांकडे चौकशी अशी कामे सुरू असून, काही प्रस्ताव तहसीलदारांकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत