अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी जमिनीच्या मोजणीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. संगमनेर तालुक्यातील २४ गावांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. या मार्गासाठी ४ हजार ७६२ शेतकऱ्यांची ४४७ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.
तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी या दोन गावातील जागेची मोजणीही पूर्ण झाली आहे. देशातील पहिल्या सेमी हायस्पीड पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत पुणे, नगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील नागरिकांना अनेक वर्षांपासून उत्सुकता होती.
केंद्र सरकारने या रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाहीस प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम जमिनीची मोजणी करून ही जागा ताब्यात घेतली जाणार आहे. संगमनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये जमिनीच्या मोजणीला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे.
पुणे ते नाशिक हा २३५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग असणार असून हा मार्ग पुणे, नगर व नाशिक या तीन जिल्यांमधून जात आहे. जवळपास ताशी १८० किलोमीटर रेल्वेचा वेग राहणार आहे. या रेल्वे मार्गावर १८ बोगदे असणार आहेत.
संगमनेर तालुक्यातील केळेवाडी, माळवाडी, बोटा, ऐलखोपवाडी, खंदरमाळवाडी, नांदूर खंदमाळ, जांबुत, साकूर, पिंपळगाव देपा, कोळवाडे, पिंपरणे, जाखुरी, खराडी, जोर्वै, कोल्हेवाडी, समनापूर, अकलापूर, अंभोरे, कोल्हेवाडी, पोखरी हवेली, पारेगाव खुर्द, नान्नज दुमाला, पिंपळे, निमोन, सोनेवाडी या गावांमधून हा रेल्वेमार्ग जाणार आहे.
या २४ गावांपैकी सर्वाधिक जमिनीचे संपादन पोखरी हवेली गावातून केले जाणार आहे. या गावातील २४ गटांमधील ५८१ शेतकऱ्यांची ३४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. भूसंपादन करताना थेट खरेदी होणार आहे. तसे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आले.
नऊ गावांचे पैसेही भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोजणीसाठी भरण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ज्या भागातून ही रेल्वे जाणार आहे. त्या भागातील शेतकऱ्यांना नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
रेल्वेमार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचे पाठीमागील ३० वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. यानंतर ही जमीन थेट खरेदी केली जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम