अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- प्रस्तावित नाशिक-पुणे सेमी हायस्पिड रेल्वेचा मार्ग अकोले तालुक्यातून प्रस्तावित असताना खर्चात वाढ करून तो संगमनेर तालुक्यातून नेण्यात आला. ही बाब आदिवासी व दुर्गम अकोले तालुक्यावर अन्याय करणारी आहे.
नाशिक-पुणे सेमी हायस्पिड रेल्वेचा मार्ग अकोले तालुक्यातून प्रस्तावित असताना बदलला कसा? असा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यासाठी कोणत्याही जनआंदोलनाची आमची तयारी आहे, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी दिला.
केंद्र सरकारकडून नियोजीत प्रस्तावित हायस्पिड रेल्वे मार्ग बदलला व शासनाच्या खर्चात वाढ केली. अकोले तालुक्याला विकासापासून वंचित ठेवले याचा निषेध म्हणून मंगळवारी शिवसेनेचे तत्कालिन नगरसेवक प्रमोद मंडलिक, शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, सतीश भांगरे, शेतकरी संघटनेचे सुरेश नवले,
महेश नवले, सुनील पुंडे, गणेश कानवडे, शुभम आंबरे, रामदास धुमाळ, अमोल पवार, चंद्रकांत आंबरे, किरण देशमुख, गणेश शिंदे, विशाल नाईकवाडी, रमेश भालेराव, नवनाथ आवारी आदींनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना मंगळवारी निवेदन दिले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसील परिसरात घोषणा दिल्या. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, पर्यटन मंत्री, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, महारेलचे कार्यकारी संचालकांना देण्यात आल्या.
प्रमोद मंडलिक म्हणाले, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग २३५ किलोमीटर लांबीचा असून खर्च १६ हजार कोटी होणार आहे. प्रस्तावित मार्ग हा अकोले-देवठाण अशा पद्धतीने जात असताना त्याच्या डिझाईनमध्ये बदल करून तो संगमनेर मार्गे नेला.
त्यामुळे अकोल्याच्या विकासाला खीळ बसली. त्यामुळे पूर्वीच्या प्रस्तावित मार्गानुसारच रेल्वे मार्ग व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम