शेवगाव :- बंधाऱ्यात बुडालेल्या मित्राला शोधण्यासाठी तो पाण्यात उतरला, परंतु त्याचाही बुडून मृत्यू झाला. दोन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे वडुले बुद्रूकवर शोककळा पसरली.
ही घटना नंदिनी नदीवर असलेल्या बंधाऱ्यात घडली. रजनिकांत ऊर्फ गुड्डू नंदू काते (३०) व अमृत रघुनाथ चोपडे (३८) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

रजनिकांत रविवारपासून घरातून बेपत्ता होता. सोमवारी शेवगाव-मिरी रस्त्यावरील वडुले गावातील पुलाजवळ त्याचा मोबाइल व कपडे आढळले. तो बंधाऱ्यात बुडाला असावा, अशी शंका आली.
सोमवारी सायंकाळी रजनिकांतचा मित्र अमृत पाण्यात उतरला. बराच वेळ झाला, तरी तो वर आला नाही, म्हणून ग्रामस्थांनी मच्छीमार व पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांना बोलावून शोध घेण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास पुलाजवळून जाणाऱ्या काही नागरिकांना रजनिकांतचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.













