अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- स्वत:च घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. याच स्वप्नांना राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाने महाआवास अभियान-ग्रामीणच्या माध्यमातून बळ दिले. दिनांक २० नोव्हेंबर, २०२० ते दिनांक ०५ जून, २०२१ या कालावधीत राबविलेल्या गेलेल्या या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल १२ हजार ५५६ नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले.
राज्यपातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत हा ई-गृहप्रवेश कार्यक्रम झाला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले,
उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना घराची चावी सुपूर्त करण्यात आली तर १४ तालुके आणि प्रत्यक्ष गावातही अभियानांतर्गत घरे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना घराची चावी देण्यात आली.
आज राज्यपातळीवर एकाच दिवशी हा ई-गृहप्रवेश कार्यक्रम दूरदृश्यप्रणाली द्वारे पार पडला. राज्यात या अभियान काळात पूर्ण झालेल्या ३ लाख २२ हजार ९२९ घरांचा ताबा संबंधित लाभार्थ्यांना आज देण्यात आला. तर या अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण १२ हजार ५५६ घरकुले पूर्ण करण्यात आली.
कोरोनाचं संकट असतानाही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि इतर प्रशासकीय यंत्रणांनी घरकूल निर्मितीला प्राधान्य दिल्याने ऐन पावसाळा सुरु होण्यापूर्वीच आता या लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी बापू निकम (विळद), सुनीता निकम (विळद),
रमाई आवास योजनेचे लाभार्थी संतोष भिंगारदिवे, लक्ष्मण साळवे (दोघेही कापूरवाडी), शबरी आवास योजनेचे लाभार्थी संदीप भाऊसाहेब गायकवाड, हरिभाऊ सुखदेव गायकवाड, सारिका नानासाहेब बर्डे (सर्व राहणार खारेखर्जुने), पारधी आवास योजनेचे लाभार्थी शिवदास रामदास भोसले (घोसपुरी), रणसिंग वसंत चव्हाण (वाळकी) यांना जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले,
जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि मान्यवरांच्या हस्ते घराची चावी प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी या सर्वांनाच त्यांच्या गृहप्रवेशाच्या स्वप्नपूर्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनीलकुमार पठारे,
किरण साळवे, संतोष भराट, आदित्य अमृत, रवींद्र वायकर, सोमनाथ ढवळे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत (सन २०१६-१७ ते २०२०-२१) प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना या योजनांतर्गत ४८ हजार ४९८ घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. *
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम