अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम.., असा इशारा अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे शिवसेनेला दिला आहे. राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
हे आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून फेटाळले. या मुद्यावर महाविकासाआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.
यावर आता भाजपा नेते भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भातखळकर म्हणाले, राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे.
या अगोदरही भातखळकर यांनी या मुद्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर टीका केली होती. सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!,
असा इशाराच त्यांनी दिलेला आहे. लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी.
शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही,असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच शिवसेनेने आता ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे,असंही भातखळकरांनी सांगितलेलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम