आषाढी वारीसाठी नियमावली झाली जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.

याबाबत पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने निमावलीत नमूद केले आहे.

मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेला प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा व विठ्ठल संतांच्या भेटीस गेल्यावर्षीप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे.

तर ‘श्रीं’चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe